पुणे- नागरिकांना सुरक्षा व जलद न्याय मिळण्यासाठी पोलिस व न्यायव्यवस्थेसाठी निधी वाढवून द्यावा व अधिक सक्षम मनुष्यबळ पुरवावे या मागणी साठी २ आक्टोबर रोजी, दुपारी एक वाजता, गांधी स्मारकापासून ते पोलिस मुख्यालयापर्यंत स्वर्ण भारत पार्टी मोर्चा काढणार आहे, अशी माहिती पक्षाध्यक्ष संजय सोनवणी यांनी दिली. या संदर्भात पक्षाने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते, परंतू त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने या मागण्यांना घेऊन राष्ट्रव्यापी आंदोलनाची ही सुरुवात करत आहोत असे सोनवणी यांनी सांगितले.

देशात गुन्हेगारीचा विस्फोट झाला असून बलात्कार, दलितांवरील अत्याचार ते बालगुन्हेगारी याचे प्रमाण वाढलेले आहे. प्रत्येक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अथवा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासाठी पुरेसे पोलिसबळ भारतात उपलब्ध नाही. दर लाख नागरिकांमागे किमान २२२ पोलिसांची आवश्यकता असतांना भारतात केवळ १४७ पोलिस आहेत. त्यांच्याकडून सक्षमतेची अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. भारतात जलद न्याय हे एक दिवास्वप्न बनले आहे कारण केवळ १८००० न्यायाधीश आहेत. यामुळे प्रलंबीत खटल्यांचे प्रमाण तीन कोटींपेक्षा अधिक गेले असून रोज त्यात भरच पडते आहे. त्यामुळे न्यायाधीश व न्यायालयांची संख्याही पुरेशा प्रमाणात वाढवली गेली नाही तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील उरला सुरला विश्वासही उडेल असे सोनवणी म्हणाले.

सरकारची कायदा व सुव्यवस्था राखणे व त्वरित न्यायाची हमी देणे ही कामे प्रमुख असतांना सरकार मात्र नको त्या आणि तोट्यात चालणा-या उद्योगव्यवसायांत रममाण आहे. लोकांचे जीवन मात्र असुरक्षिततेने ग्रासलेले आहे. सरकारने तत्काळ उद्योगव्यवसायांतून बाहेर पडत आपल्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करावे ही या मोर्चाची प्रमूख मागणी आहे असे सोनवणी म्हणाले. या मोर्चात स्वत: संजय सोनवणी, पक्षाचे उपाध्यक्ष आलोक कुमार, सचीव विद्यूत जैन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मृणाल ढोलेपाटील व पक्षाचे पाचशे कार्यकर्ते सामील होणार आहेत.

TAGS