पुणे : व्यवस्थेत सुधारणा केल्याखेरीज काळा पैसा व बेनामी मालमत्तांसारख्या अर्थव्यवस्थेला कीड लागलेल्या बाबी नष्ट होणार नाहीत.  नोटबंदीचा निर्णय वरकरणी चांगला असला तरी या उपायाने काळे धन बाहेर येईल हा एक भ्रम आहे. काळे धन व बनावट चलनाची निर्मितीच ज्या कारणांमुळे होते ती कारणे समूळ नष्ट केल्याखेरीज हा प्रश्न संपणार नाही असे स्वर्ण भारत पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी सांगितले.
 
आताच्या चलनबंदी घोषणेने सर्वसामान्य नागरिकांना यातना होण्यापलीकडे विशेष काही साध्य होणार नाही, त्यामुळे भावनिक आव्हाने करून श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेची दिशाभूल करू नये. समाजवादी व्यवस्थेत बाबुशाही व शासनाला मिळालेले अमर्याद अधिकार, निवडणूक पद्धतीत बदल नसणे व अयोग्य करपद्धती यामुळे काळा पैसा जन्माला येतो. आजच्या चलनातील काळा पैसा सफेद होण्यासाठी पुष्कळ पळवाटा व्यवस्थेनेच ठेवल्यामुळे त्यांना नोटबंदीची विशेष धास्ती नाही. पण नवीन नोटांचे अत्यंत अकार्यक्षम वितरण, नोटांची ब्यंकांकडे असलेली अनुपलब्धता यामुळे सामान्य माणसाचे प्रचंड हाल होत आहेत. किमान वितरण व्यवस्थेची चांगली पुर्वतयारी करुन हा निर्णय घोषित करायला हवा होता. पण श्री. मोदींना जनता व अर्थव्यवस्थेच्या काळजीऐवजी प्रसिद्धीचीच हौस अमर्याद आहे हे त्यांनी ज्या घाईने घोषणा केली त्यावरून दिसते असेही सोनवणी म्हणाले.
 
सरकारने नियंत्रकाच्या भुमिकेत न राहता रक्षणाच्या भुमिकेत रहावे हे मुलतत्व असतांना बाबुशाहीच्या सहकार्यानेच भारतात प्रचंड काळा पैसा जन्माला येतो. आताही नोटबंदीमुळे काळा पैसा संपणार नसून त्याचे फेरवितरण होईल याची चिन्हे दिसत आहेत. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला खिळ घालणारे निर्णय घेण्यापेक्षा व्यवस्थेतच आमुलाग्र बदल करण्यावर भर दिला पाहिजे व स्वर्र्ण भारत पक्षाने जाहीरनाम्यात सुचवलेल्या व्यवस्थेवर विचार केला पाहिजे असेही सोनवणी म्हणाले. 

TAGS